श्री कपर्दिकेश्वर मंदिर, श्री क्षेत्र ओतूर , ता. जुन्नर, जि. पुणे | Kapardikeshwar Temple Otur Junnar Tourism in Marathi




पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस जुन्नर तालुक्यात कल्याण नगर राज्य महामार्ग क्र.222 वर पुण्यापासून 100कि.मी अंतरावर वसलेले ऐतिहासिक ओतूर हे गाव महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध झाले,ते येथील कपर्दिकेश्वर आणि बाबाजी चैतन्य महाराजांच्या समाधी स्थळामुळे. इ.स १३४७ मध्ये महाराष्ट्रात बहमनी राज्याची स्थापना झाली.त्यावेळी ओतूर गावाचा व जुन्नर परिसराचा समावेश बहमनी राज्यात होता.बहमनी राज्याच्या विघाटनानंतर निर्माण झालेल्या पाच सत्तां पैकी ओतूर परिसरावर निजामशाहिची सत्ता होती.१० नोव्हेम्बर १५६६ रोजीच्या एका फार्सी पत्रामध्ये ओतूर गावचा उल्लेख वोतूर असा आढळतो.
अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या गावाच्या उत्तरेस एक कि.मी. अंतरावर झाडाझुडपातून ,डोंगरदऱ्यातून खळाळत येणाऱ्या दाक्षिण वाहिनी चंद्रकोर ष पवित्र मांडवी नदीच्या तीरावर अतिशय निसर्गरम्य परिसरात मनमोहक भव्य श्री क्षेत्र कपर्दीकेश्वराचे मंदिर वसलीले आहे. या मंदिराचे देखने रूप पाहताक्षणी भक्तांचा थकवा दूर होतो.बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज संजीवनी समाधी मंदिर व संत तुकाराम महाराज मंदिर या त्रिस्थळी पवित्र स्थानामुळे पावन झालेले हे ठिकाण हवेहवेसे वाटनारे आहे.वारकरी सांप्रदायाचा “रामकृष्णहरि” हा मंत्रघोष याच ठिकाणी प्रथम दिला गेला,म्हणून या स्थानाला धर्मिकदृष्टया अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.

उत्तमापूर हे गावचे प्राचीन नाव.या नावातच ओतूर गावाची प्राचीनता लक्षात येते.उत्तमापूर चा अपभ्रंश होत ओतूर हे नाव पुढे पुढे रूढ़ झाले.फार पूर्वीपासून मांडवी नदी किनारी वसलेले समृद्ध प्राचीन नगर आणि “स्वयंभू शिवलिंगाच्या” कपर्दीकेश्वर मंदिराच्या जागृत अशा ठिकाणाचा उल्लेख पुराणकालापासून होत आलेला आहे; परंतु हे स्थान खऱ्या अर्थाने प्रकाशात आले ते शिवलिंगावरील “कलात्मक” कोरड्या तांडळाच्या पिंडीमुळे आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांना त्यांचे गुरु बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराज यानी स्वप्नात येऊन अनुग्रह देऊन उपदेश केल्यामुळे.संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा तपश्चर्येसाठी उत्तम असे ठिकाण म्हणून उल्लेख केलेला आहे. संतांची तपोभूमी म्हणून या ठिकानाला खूप महत्व असूनही पंढरपूर ,आळंदी ,देहू यांच्या तुलनेत ओतूर हे तीर्थक्षेत्राचे स्थान मात्र महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिलेले आहे.

कपर्दीकेश्वर या नावाविषयी एक आख्यायिका आहे. राघव चैतन्य स्वामींचा कार्यकाल १५ व्या शतकातील आहे. त्यांनी मांडवी नदीकिनारी घनदाट अरण्यात महर्षी व्यासांचे दर्शन व्हावे म्हणून कठोर साधनेद्वारे बारा वर्षे अनुष्ठान केले. येथील मांडवी नदीच्या तीरावर वाळूचे शिवलिंग तयार करीत असताना त्यांना एक कवाडी मिळाली. (संस्कृतमध्ये कवडीला कप्रदिक असे म्हणतात.) आपल्या तपश्चर्यचे फळ म्हणजे कवडी मिळाल्यामुळे. महाराज अतिशय दुःखी झाले. त्यांनी ती कवडी फोडली. त्यात एक अतिशय तेजस्वी, सुंदर स्वयंभु शिवलिंग मिळाले. महाराजांच्या प्रेरणेने या लिंगाचे कपर्दीकेश्वर हे नामकरण करुन या ठिकाणी लोकांनी मंदिर बांधले. तसेच नवव्या शतकातील शिलाघर राजवंशातील नववा झंझ या राजाने प्राचीन शिवलिंगावर सुंदर मंदिर उभारले होते. १२व्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुध्दा या तपोभूमीचा उल्लेख केला आहे. यादव राजवटीच्या अस्तानंतर अनेक लहानमोठ्या टोळ्यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले. यात इराणच्या मुस्लीम टोळ्यांनी या भागात धुमाकूळ घालून खुप संपत्ती लुटण्याबरोबर या ठिकाणची मंदिरे देखील जमीनदोस्त केली. त्या काळात याच मांडवी तीरावर घनदाट जंगलात या प्राचीन व जागृत शिवलिंगाची स्थापना महर्षी व्यासांनी राघव चैतन्य महाराजांच्या हस्ते करून मंदिर उभारणी केली. मांडवी नदी ऋषिवर्य मांडव्य ॠषींच्या आश्रमापासून उगम पावून आपल्या दोन्ही किनाऱ्यांच्या पारिसरला विलोभनीयरीत्या सुशोभीत करीन या तीर्थक्षेत्राजवळ येऊन दाक्षिणवाहिनी चंद्राकार घेऊन संथपणे आजही वाहत आहे. याच पवित्र ठिकाणी बाबाजी ऊर्फ केशव चैतन्य महाराजांनी गुरुवार वैशाख शु. द्वादशी इ.स.१५७१ रोजी वयाच्या ४७व्या वर्षी ओतुर येथे संजीवन समाधी घेतली. ठिकाणी संत चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश करून अनुग्रह देत ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र दिला. या मंत्राचा जप आज जगभर होताना आढळतो. चैतन्यांच्या संजीवन समाधीवर वाढलेले वारुळ हे नैसर्गिक असून, दगड किंवा विटांचा यात समावेश नसूनसुद्धा शेकडो वर्षे होऊनही या समाधीची एक कण माती सुद्धा वेगळी झाली नाही. १९५३ साली गावकऱ्यांनी एकत्र येऊन कपर्दीकेश्वर देवस्थान ट्रस्टची स्थापना केली आणि १९५८ साली मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. तसेच चैतन्यस्वामी समाधी स्थानावर मंदिर बंधण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात तुकाराम महाराजांचे भव्य असे मंदिर देहु व ओतुर या दोनच ठिकाणी आहे.

अधिक छायाचित्रे






श्री कपर्दिकेश्वर मंदिर, श्री क्षेत्र ओतूर ला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - ओतूर, पुणे - नाशिक -पुणे (आळेफाटा - ओतूर), जुन्नर - ओतूर, नारायणगाव - ओतूर एसटी बस ची सोय आहे.

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण, पुणे, नाशिक

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ 


धन्यवाद. 

माहिती संकलन- प्रा.केतन डुंबरे, कार्यकारी संपादक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad