स्थळ : आळे रेडा समाधी ता.जुन्नर जि.पुणे
ऊंची : ८६० मी.
श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराचा इतिहास (रेडा समाधी मंदिर)
मंदिराचे बांधकाम शके १७८५ पुर्ण केले, मंदिराचे बांधकाम सुरुवात शके १७८४ मंदिर बांधकाम पुर्ण शके १७८५ मंदिराचे बांधकाम कै. आनंदराव भिकाजी शेटे यांनी शके १७८४ ला सुरु करुन त्यांचे सुपूत्र कै. रघुपंतराव शेटे यांनी पुरे केले याच घराण्यातील श्री. भालचंद्र रघुपंतराव शेटे यांनी शके १८७६ फाल्गुन शुद्ध पंचमी दि. २७ फेब्रुवारी १९५५ रविवार रोजी श्री. ज्ञानेश्वर महाराजांची मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. (प्राणप्रतिष्ठा मंदिराचा साविस्तर वृतांत पुस्तकात आहे.)
मंदिराचा भौगोलीक इतिहास
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्यामुखी वेद बोलवले त्या रेड्याची समाधी पुणे जिल्यातील जुन्नर तालुक्यातील आळे गावी आहे.आळे गाव हे पुणे नाशिक हायवेवरुन ३ कि. मी. अंतरावर असून विशाखापट्टणम कल्याण हायवे नं. २२२ वरुन २ कि. मी. अंतरावरती रेडासमाधी मंदिर आहे. मंदिराच्या दक्षिणबाजुला कोळवाडी गाव असून मंदिराच्या उत्तरेला संतवाडी गाव आहे. मंदिराच्या पुर्वेला ग्रामदैवत कानिफनाथाचा डोंगर असून पश्चिमेला आळेफाटा हे मोठे व्यापारी क्षेत्र असलेले पुणे नाशिक हायवेवरचे ठिकाण आहे.
संदर्भ
एक जगप्रसिद्ध असलेल्या प्राण्याची अनोखी वेद बोलल्याची प्रचिती आपणास श्रीसंत ज्ञानेश्वर यांच्या अध्ययनातु येते. त्याच रेड्याची समाधी असलेल जुन्नर तालुक्यातील आळे हे गाव. या समाधीस्थ परीसरातील झालेला विकास पाहून खुप समाधान लाभले. आपण कधी पुणे ते नाशिक प्रवास करत असाल किंवा अहमदनगर ते कल्याण प्रवास करत असाल तर आळेफाटा येथे उतरून नजदीक आळे येथील अगदी 4 कि.मी अंतरावर असलेल्या या रेडा समाधीचे नक्कीच दर्शन घेऊ शकता.
ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधी स्थळाची माहिती
श्री क्षेत्र आळे, ता. जुन्नर, जि. पुणे.
येऊनिया उतरिले आळेचिये बनी। पशु तये स्थानी शांत जाहला॥
संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील समाधी स्थानाचे वरीलप्रमाणे वर्णन आपल्या अभंगामध्ये केलेले आहे. आळंदीच्या तथाकथित धर्म मार्तंडानी श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्म सभेचे शुध्दीपत्र मागितलेवरुन ही भावंडे पैठण येथील धर्म सभेमध्ये गेले असताना त्यांना अनेक सत्वपरिक्षांना तोंड द्यावे लागले. त्याचप्रसंगी वाकोबा नावाचा कोळी आपल्या गेनोबा नावाच्या रेड्यास घेऊन जात असताना धर्म सभेतील एका धर्म पंडिताने ज्ञानेश्वर महाराजांना त्या रेड्याचा तुझा आत्मा एकच आहे का? हे सिध्द करुन दाखव असे सांगितलेवरुन ज्ञानदेवांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून वेद उच्चारण्याची आज्ञा केली. लगेचच रेड्याच्या मुखातून ऋगवेदाच्या पुढील श्रृती बाहेर पडल्या-
ॐ अग्निमुळे पुरोहित यज्ञस्य देव मृत्विजम। घेतार रत्न धाततम॥
पशुमुखे वेदाच्या श्रृती। वाढवा किर्ती तूमचीये॥
संत निळोबाराय
पुढे नेवासा ह्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे लेखन केल्या नंतर श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताई, रेडा व वाकोबा कोळी हे सर्व बरोबरच्या संतासमवेत आळे गावाच्या उत्तरेस असलेल्या अकलापूर या गावी आले तेथून संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरावरती विसावा घेत असताना समोर दिसणाऱ्या भुमीचे निरीक्षण करीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी वर्तुळाकार अशी निसर्गसंपन्न भुमी पाहून या भूमीचे आळे असे नामकरण केले याच भूमीस पुर्वी अलंकापुरी म्हणून संबोधीत असत. सदर ठिकाणी रेड्याने श्री ज्ञानेश्वर महाराजांकडे आपणाला याच ठिकाणी समाधी द्यावी अशी इछा प्रदर्शित केली. त्यावळी ज्ञानदेवांनी पुढील भविष्य जाणुन आजच्या समाधीस्थळी येऊन शके १२१२ (इ. स. १२९०) माघ वद्य १३ (त्रयोदशी) या दिवशी स्वहस्ते या रेड्यास समाधी दिली.
या समाधीला श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपनदेव, मुक्ताई या चार भावंडांचे हात लागलेली महाराष्ट्रातील ही एकमेव समाधी आहे. ही समाधी अत्यंत प्राचीन असुन वारकरी सांप्रदयामध्ये या तिर्थक्षेत्राला अत्यंत महत्त्व असुन आळंदी, पंढरपूराच्या खालोखाल वारकरी सांप्रदयात या तिर्थक्षेत्राची गणना केली जाते. ज्या वारकऱ्यांची पंढरपूर आळंदीची वारी चुकते ते वारकरी आळ्याची वारी करुन पंढरपूर – आळंदीच्या वारीचे पुण्य पदरात घेतात. रेड्याच्या समाधीस्थळी आजपर्यंत अखंड जळणारा नंदादिप, अखंड विणापूजन, अभिषेक, आरती, हरिपाठ, यज्ञयाग, अन्नछत्र, भजन, जागर, किर्तन, भारुड इ. धार्मिक कार्यक्रम होतात. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भाविक शुद्ध व वद्य एकादशीला दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक एकादशीला व व्दादशीला गावागावचे भाविक या ठिकाणी अन्नदानाचे कार्यक्रम करीत असतात.
चैत्र वैद्य एकादशीला देवाची (३) तीन दिवस यात्रा भरत असते. दुसऱ्या दिवशी सगळ्या वारकऱ्यांना व्दादशीचे अन्नदान संतवाडी, कोळवाडी व डावखरवाडी यांचे करुन करण्यात येते त्यानंतर दुपारी महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांचा आखाडा गाजतो व शेवटच्या दिवशी दहीहंडी फोडून यात्रेची सांगता होते. या समाधीस्थळी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन त्याच प्रमाने वारकऱ्यांच्या सोई सुविधा पुरविण्याच्या दृष्टीकोनातून देवस्थान ट्रस्टने केलेले प्रयत्न पाहून महाराष्ट्र शासनाने सन – २००३ साली देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा ’क’ दर्जा दिलेला आहे.
शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वच्छतागृह, सार्वजनिक मुतारी, भक्तनिवास, पिण्याच्या पाण्याची टाकी इ. कामे पुर्ण केली असुन, नियोजीत कामांमध्ये धर्मशाळा, रस्ता पाणीपुरवठा योजना, एस. टी. पिकअपशेड, गटर योजना बागबगीचा, व संरक्षक भिंतीचे काम हाती घेतले असुन ते लवकरात लवकर आपणा सर्व भाविकांच्या , देणगीदारांच्या आर्थिक सहकार्यातून पुर्ण होईल. ज्या भाविकांना आपल्या यथाशक्तीनुसार देणगी द्यावयाची असेल त्यांनी श्री ज्ञानेश्वरमहाराज देवस्थान ट्रस्ट ( संस्था ) श्री क्षेत्र आळे कर्यालयात संर्पक साधावा ही व विकासकामगारांना हातभार लावावा हि विनंती.
अधिक छायाचित्रे
संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी, श्री क्षेत्र आळे ला कसे पोहोचाल?
बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - आळेफाटा, पुणे - नारायणगाव - आळेफाटा, पुणे - नाशिक - पुणे (आळेफाटा), जुन्नर - नारायणगाव - आळेफाटा एसटी बस ची सोय आहे.
रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण, पुणे, नाशिक
विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ
धन्यवाद.
माहिती संकलन: प्रा.केतन डुंबरे, कार्यकारी संपादक
Very nice information, helpful to all travelers and local peoples..!!
उत्तर द्याहटवाThanks for sharing ..!!
धन्यवाद 🙏
हटवा