भारतातील सर्वात प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विदयेचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील उत्तरेस अखंड स्वराज्याचे छत्रपती श्री शिवाजी राजे शहाजीराजे भोसले महाराज यांची जन्मभूमी म्हणजेच शिवजन्मभूमी असा नावलौकिक असणारा तालुका म्हणजेच "जुन्नर" तालुका होय.
ठाणे, अहमदनगर जिल्ह्यांना लागून असलेला आणि सह्याद्रीच्या रांगेत वसलेला ऐतिहासिक आणि भौगोलिक दृष्ट्या संपन्न असलेला जुन्नर तालुका निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण नटलेला आहे. म्हणूनच तत्कालीन आमदार शरददादा सोनवणे आणि माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या प्रयत्नातून २१ मार्च २०१८ रोजी महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुक्याला महाराष्ट्रातील पहिला "पर्यटन तालुका" म्हणून घोषित केले.
चला तर मग, जुन्नर विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
भौगोलिक:
राष्ट्र : भारत, राज्य : महाराष्ट्र, जिल्हा : पुणे, तालुका : जुन्नर, जुन्नर नगर परिषद, जुन्नर पंचायत समिती, ग्रामपंचायती : १८१
इतिहास:
जुन्नर शहराला इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. जुन्नर हे इसवी सन पुर्व सातवाहन कालखंडा पासूनच व्यापाराचे केंद्रस्थान होते ते जुन्नरला लाभलेल्या भौगोलिक रचनेमुळे. साधारण इसवी सनापूर्वी ५०० सालातल्या कालखंडात महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. प्रतिष्ठान [आताचे पैठण] ही सातवाहन राजांची राजधानी आणि जीर्णनगर [आताचे जुन्नर] ही उपराजधानी होती.
त्या काळी जगभरातील व्यापारी कल्याण बंदरावर आपला माल घेऊन उतरत असत. मग नाणे घाट मार्गे ते घाटमाथ्यावर येऊन जुन्नर मार्गे पैठणला व्यापार करत करत जात असत. तेव्हाचे कर आकारणीचे दगडी रांजण आजही नाणे घाटात आहेत. कल्याण-नाणे घाट-जुन्नर-नगर-पैठण हा महाराष्ट्रातील प्राचीन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरील जुन्नरची बाजारपेठ तेव्हापासूनच प्रसिद्ध होती.
हा व्यापार उदीम वाढत जावा, आपल्या प्रदेशाची अशीच भरभराट होत राहावी आणि नाणे घाट मार्गे जुन्नरच्या डोंगराळ भागातून येणाऱ्या या व्यापारीमार्गाचे संरक्षण व्हावे आणि लूटमारीपासून बचाव व्हावा म्हणून त्या त्या वेळच्या राजवटींमध्ये भैरवगड, जीवधन, चावंड, हडसर, निमगिरी, ढाकोबा, शिवनेरी, नारायणगड, सिंदोळा यासारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली.
टिकाऊ खडकाचा प्रदेश म्हणून भारतातील सर्वात जास्त गिरिदुर्ग जुन्नरमध्ये निर्माण झाले. देशविदेशातून येणारे व्यापारी त्यांची संस्कृती पण सोबत घेऊन यायचे. जुन्नरमध्ये उत्खनन करत असताना त्यांना ग्रीक लोकांची देवता "युरोस"ची मूर्ती, चिनी भांडी, जुनी नाणी, सोन्याच्या मोहरा, शिलालेख असे खूप काही या भागामध्ये सापडले. येणारे व्यापारी मुक्त हस्ताने दान करत असत.त्यामुळे जुन्नर परिसरात प्रत्येक धर्माची, धर्मपीठाची भरभराट झाली.
ऐतिहासिक नोंदी:
१) मध्ययुगीन काळात लेण्याद्रीच्या बौद्ध लेण्यांमध्ये गिरिजात्मक गणपतीची स्थापना झाली.
२) पेशवे काळात जुन्नरजवळच्या ओझरच्या विघ्नहराचा जीर्णोद्धार झाला.
३) ओतूर येथे गुरु चैतन्य महाराजांनी वैष्णव पंथाचा ’रामकृष्ण हरी” हा मंत्र संत तुकारामांना दिला.
४) संत ज्ञानेश्वरांनी आपल्या रेड्याला जुन्नर तालुक्यातल्या आळे गावी समाधी दिली.
५) पिंपळगाव जोगा धरणाजवळ खुबी गावात खिरेश्वर या पांडव कालीन मंदिराची निर्मिती झाली, खिरेश्वराच्या उत्तरेला हरिश्चंद्र गड आहे.
६) जुन्नरच्या किल्ले शिवनेरी किल्ल्यावर फेब्रुवारी १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
७) पेशवे कालीन महालक्ष्मी मंदिर उंब्रज येथे आहे.कोल्हापूर महालक्ष्मीचे ते उपपीठ मानले जाते.
भौगोलिक नोंदी:
१) जुन्नरचे पाहिले नाव जीर्णनगर होते. पुढे ते अपभ्रंश होऊन जुन्नेर नंतर मग जुन्नर झाले.
२) जुन्नर सह्याद्री पर्वत रांगेत बसल्यामुळे पश्चिमेकडील भाग हा डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील भाग हा मैदानी आहे.
३) याच सह्याद्रीच्या कुशीत निसर्ग सौंदर्याने नटलेला माळशेज घाट, नाणेघाट , दाऱ्या घाट , हरिशचंद्र गड, कोकणकडा आहे.
४) सातवाहन कालीन अनेक लेणी, त्याचे अवशेष, विहिरी या भागात आहेत.
५) माणिकडोह धरणाच्या पायथ्याला महाराष्ट्रातील एकमेव बिबट्या निवारण केंद्र आहे. १९९५साली जगातील सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बीण जुन्नर तालुक्यात खोडद या गावी उभारण्यात आली. जवळच आर्वीचे उपग्रह भूकेंद्रही आहे.
६) श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्या मुळे जुन्नर च नाव साखर क्षेत्रात आघाडीवर आहे. माजी खासदार स्व. निवृत्तिशेठ शेरकर, स्व. सोपानशेथ शेरकर यांनी स्थापन केलेल्या आणि श्री. सत्यशीलदादा शेरकर यांच्या नेतृत्त्वाखाली या साखर कारखान्यामुळे येथील भूमिपुत्रांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे.
७) कुकडी नदीतील रांजणखळगे
शेती:
जुन्नर हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे असलेला एकमेव तालुका आहे. जुन्नर तालुक्यात पिंपळगाव जोगा, माणिकडोक, येडगाव, वडज आणि चिल्हेवाडी हि पाच धरणे आहेत. मांडवी,पुष्पावती,काळू, कुकडी,आणि मिना या नद्यांचा याच तालुक्यात उगम होतो. कुकडी जलसिंचन प्रकल्पामुळे जुन्नर मध्ये बहुतेक भाग सुजलाम सुफलाम झाला आहेत. जुन्नर तालुक्यात शेतीमध्ये प्रामुख्याने कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, बटाटा, गहू, ज्वारी, बाजरी,ऊस,आंबा,डाळिंब,भाजीपाला,फुले इ. पिके घेतली जातात. ह्या सगळ्या मालाची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती, नारायणगाव कृषी उत्पन्न उप-बाजार समिती मार्फत मोठी उलाढाल होते. नारायणगाव कृषी उत्पन्न उप-बाजार समिती ही भारतातील सगळ्यात जास्त टोमॅटो चा लिलाव करणारी एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती आहे.
खाद्यसंस्कृती:
जुन्नरची खाद्यसंस्कृती आपले एक वेगळेपण जपून आहे. जुन्नरला आलात आणि येथील खालील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतला नाही असा कधीच होणार नाही.
१) जुन्नरची पुरणपोळी आणि सार
२) आमटी भाकर
३) जुन्नरची स्पेशल मासवडी आणि भाकर
४) जुन्नरची शेंगोळी
५) पिठलं भाकर
६) राजूरचा पेढा
७) ढोबळ्यांचा पेढा
८) जुन्नरची झणझणीत मिसळ
९) जुन्नरची चटकदार भेळ
१०) यात्रेतील गोल भजी, जिलेबी आणि शेव रेवडी
प्रसिद्ध पर्यटन स्थळे:
१) निसर्गाने नटलेले आठ किल्ले :
- किल्ले चावंड (चावंड गाव)
- किल्ले जीवधन (घाटघर)
- किल्ले नारायणगड (नारायणगाव, खोडद)
- किल्ले निमगिरीव हनुमंतगड (निमगिरी गाव)
- किल्ले शिवनेरी (जुन्नर)
- किल्ले सिंदोळा (मढ, पारगाव)
- किल्ले हडसर (हडसर गाव)
- किल्ले ढाकोबा (आंबोली/ ढाकोबा)
- किल्ले हरिचंद्रगड (खिरेश्वर)
२) लेणी समूह :
भारतात जुन्नर तालुका हा भारतातील एकमेव असा तालुका आहे की जेथे सर्वाधिक ३६० लेणी आहेत. त्यांमधे हिंदू, बौद्ध, जैन लेण्यांचा समावेश आहे. लेण्यांची यादी :
- अंबा-अंबिका लेणी (खोरे वस्ती-जुन्नर)
- खिरेश्वर लेणी समूह (खिरेश्वर)
- चावंड लेणी (चावंड गाव)
- जीवधन लेणी समूह (घाटघर)
- तुळजा भवानी लेणी (पाडळी)
- नाणेघाट लेणी (घाटघर)
- निमगिरी लेणी (निमगिरी गाव)
- भूत लेणी (जुन्नर)
- लेण्याद्री विनायक लेणी (लेण्याद्री)
- शिवाई लेणी (शिवनेरी किल्ला-जुन्नर)
- सुलेमान लेणी (लेण्याद्री)
- हडसर लेणी (हडसर गाव)
- ग] प्रसिद्ध मंदिरे :
- गिरिजात्मक (लेण्याद्री)
- विघ्नेश्वर (ओझर)
३) हेमाडपंथी बांधणीतील प्राचीन मंदिरे :
- कुकडेश्वर मंदिर (कुकडेश्वर)
- नागेश्वर मंदिर (खिरेश्वर)
- अर्धपीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर(पारुंडे)
- हरिश्चंद्रेश्वर मंदिर (हरिश्चंद्रगड)
४) अन्य प्राचीन मंदिरे :
- उत्तरेश्वर मंदिर (जुन्नर)
- कपर्दिकेश्वर मंदिर (ओतूर)
- खंडोबा मंदिर (धामनखेल)
- खंडोबा मंदिर (नळावणे)
- खंडोबा मंदिर (वडज)
- गुप्त विठोबा-प्रतिपंढरपूर मंदिर (बांगरवाडी)
- जगदंबा माता मंदिर (खोडद)
- दुर्गादेवी मंदिर (दुर्गावाडी)
- पंचलिंगेश्वर मंदिर(जुन्नर)
- पातालेश्वर मंदिर (जुन्नर)
- महालक्ष्मी मंदिर (उंब्रज)
- रेणुका माता मंदिर (निमदरी)
- वरसूबाई माता मंदिर (सुकाळवेढे)
- शनी मंदिर-प्रतिशिंगणापूर (हिवरे-बुद्रुक)
- हाटकेश्वर मंदिर (हाटकेश्वर डोंगर)
५) संत समाधी मंदिरे :
- संत जगदगुरू तुकाराम महाराजांचे गुरू - केशव तथा बाबाजी चैतन्य महाराज यांची समाधी (ओतूर)
- संत मनाजीबाबा पवार(निमगावसावा)
- संत रंगदासस्वामी समाधी (अणे)
- संत ज्ञानेश्वर वेद प्रणीत रेड्याची समाधी (आळे)
६) निसर्गरम्य घाट :
- अणे घाट
- इंगळून घाट
- कोपरे-मांडवे घाट
- दार्या घाट
- नाणेघाट-पुरातन व्यापारी मार्ग
- माळशेज घाट
- म्हसवंडी घाट
- लागाचा घाट
- हिवरे-मिन्हेरे घाट
७) प्रसिद्घ धबधबे :
- आंबोली
- नाणेघाट
- माळशेज घाट
- इंगळूज
- हातवीत
- दुर्गादेवी
- मुंजाबा डोंगर(धुरनळी)
८) नद्या व उगम :
- मांडवी नदी-उगम-फोपसंडी(अहमदगर)
- पुष्पावती नदी-उगम-हरिचंद्रगड
- काळू नदी-उगम-हरिचंद्रगड
- कुकडी नदी-उगम-कुकडेश्वर
- मीना नदी-उगम-आंबोली
९) धरणे :
- चिल्हेवाडी धरण-मांडवी नदी
- पिंपळगाव जोगा धरण-पुष्पावती नदी
- माणिकडोह धरण- कुकडी नदी
- येडगाव धरण-कुकडी नदी
- वडज धरण-मीना नदी
१०) खिंडी :
- गणेश खिंड
- मढ खिंड
- आळे खिंड
- टोलार खिंड
११) उंच शिखरे :
- हरिचंद्रगड(१४२४ मीटर) : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच डोगर शिखर
- जीवधन
१२) पठारे :
- अंबे-हातवीत पठार
- नळावणे पठार
- कोपरे-मांडवे पठार
- अणे पठार
१३) गिर्यारोहकांना आव्हान देणारे उंच कडे :
- नाणे घाट
- माळशेज घाट
- दार्या घाट
- ढाकोबा
- दुर्गादेवी
- हरिचंद्रगड
१४) नैसर्गिक पूल :
- अणे घाटातील नैसर्गिक पूल
- हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पूल
१५) प्रसिद्ध विहिरी :
- बारव बावडी-जुन्नर
- पुंदल बावडी-जुन्नर
- आमडेकर विहीर-पाडळी
१६) ऐतिहासिक वास्तु :
- सैदागर हाबणी घुमट-हापूसबाग
- ३०० वर्षे जुनी मलिकंबर बाराबावडी पाणीपुरवठा योजना-जुन्नर शहर
- नवाब गढी-बेल्हे
- गिब्सन निवास व समाधी
१७) जुन्नर तालुक्यातील दगड घंटेसारखे वाजतात.
- आंबे गावच्या पश्चिमेस २०० मीटरवर
- दुर्गादेवी किल्ल्याच्या टॉपवर
१८) रांजणखळगे :
- माणिकडोह गाव-कुकडी नदी
- निघोज-कुकडी नदी
१९) जागतिक केंद्रे :
- जागतिक महादुर्बीण-खोडद
- विक्रम दळणवळण उपग्रह केंद्र-आर्वी
२०) कारखाने :
- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना- शिरोली बुद्रुक
- कागद कारखाने-जुन्नर
- आशियातील पहिली वायनरी-चाटो इंडेज-चौदानंबर (पुणे-नाशिक हायवेवर)
२१) बिबट्या निवारण केंद्र :
- माणिकडोह
२२) ३५० वर्षांची परंपरा / इतिहास असलेले आठवडे बाजार :
- सोमवार-बेल्हा
- गुरूवार-ओतूर
- शनिवार-मढ
- शनिवार-नारयणगाव
- रविवार-जुन्नर
२३) तमाशा पंढरी:नारायणगाव(जुन्नर तालुका) :प्रसिद्ध तमासगीर :
- भाऊ बापू मांग नारायणगावकर
- सौ.विठाबाई नारायणगावकर (राष्ट्रपती पारीतोषिकप्राप्त)
- दत्ता महाडीक पुणेकर - मंगरुळ पारगाव / बेल्हा
- मंगला बनसोडे - नारायणगाव
- मालती इनामदार - नारायणगाव
- पाडुरंग मुळे मांजरवाडीकर- मांजरवाडी/नारायणगाव
- दत्तोबा तांबे शिरोलीकर - बोरी शिरोली
- दगडू पारगावकर - पारगाव तर्फे आळे
२४) पुणे जिल्हातील पहिले सिनेमागृह :
- शिवाजी थिएटर-जुन्नर
जुन्नर ला कसे पोहोचाल?
बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर , पुणे - जुन्नर , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव - जुन्नर) एसटी बस ची सोय आहे.
रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे , नाशिक
विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ
धन्यवाद.
माहिती संकलन: हर्षल भगत, मुख्य संपादक