श्री ज्ञानेश्वर महाराज पसायदान | Pasaydan in Marathi

॥ जय जय रामकृष्ण हरि ॥ 

अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र । तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र ॥१॥ 
तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ॥२॥ 

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी॥१॥ 
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा॥२॥ 
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी॥३॥ 
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवरी ठेवून या ॥१॥ 
तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ 
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥ 
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥


॥ पसायदान ॥

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । 
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ॥१॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो । 
भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥२॥

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । 
जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥३॥

वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । 
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥४॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । 
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । 
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६॥

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । 
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥७॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । 
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ॥८॥

येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो । हा होईल दानपसावो । 
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥९॥


श्री.रवींद्र साठे यांच्या सुमधुर वाणीतून पसायदान 

     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad