श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान तिर्थक्षेत्र वडज ता. जुन्नर जि. पुणे | Shree Kulswami Khanderay Devasthan Temple Junnar Tourism in Marathi

!! श्री कुलस्वामी खंडेराय प्रसन्न !!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाचे एक देवस्थान पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात तिर्थक्षेत्र वडज या ठिकाणी आहे. जुन्नर शहरापासून ६ किमी अंतरावर असलेले वडज हे मीना नदीच्या काठावर वसलेलं एक टुमदार गाव आहे. तसेच याच गावात असलेल्या वडज धरणामुळे वडज च्या निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. अश्या निसर्गरम्य गावात असलेलं श्री कुलस्वामी खंडेरायाचे देवस्थान मुळे वडज ला नावलौकिक प्राप्त झाले. 

या खंडोबाचे मूळ स्थान वडज च्या भंडाऱ्या डोंगरावर असलेल्या जोगध्यावर आहे. वडज गावापासून जोगधा साधारण १.२ किमी आहे. सदानंद चव्हाण कुटुंबीय मनोभावे देवाची सेवा करत असताना वयोमानानुसार शरीर साथ देत नसल्याचे परंतु अजून तुझी सेवा करायची आहे असे देवाला सांगितले आणि जोगध्यावरून खाली येण्याची विनंती देवाला केली. 

भक्ताच्या सादेला भंगवंताने हाक दिली आणि चंपासष्टीच्या दिवशी गाढ झोपेत असणाऱ्या सदानंदाला साक्षात खंडोबाचा साक्षात्कार झाला. खंडोबाने सदानंदाचा सांगितले कि उद्या जेव्हा माझी पूजा करण्यासाठी तू जोगध्या वर येशील तेव्हा मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येईल. परंतु माझी एक अट आहे. जेव्हा मी जोगध्यावरून निघेल तेव्हा तू सरळ चालत राहायचे आणि मागे वळून बघायचे नाही, ज्या क्षणी तू मागे वळून बघशील त्याच क्षणी मी दिसेनासा होईल. सदानंदाने खंडोबाची अट मान्य केली आणि ठरल्याप्रमाणे सदानंद मोठ्या आनंदाने देवाची पूजा करण्यास जोगध्यावर गेले. देवाची पूजा केली. आणि देवाला आपल्यामागे येण्याची विनंती करून घराकडे प्रस्थान केले. सदानंद भंडारा डोंगर उतरून खाली आला आणि त्याच्या मनात देव नक्की आपल्या मागे येतोय का, देवाचे गोंडस रूप कसे असेल हे बघण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी मागे वळून बघितले. त्याच क्षणी मोठा आवाज झाला आणि तेथे असलेल्या बोरीच्या झाडात खंडोबा विलीन झाले.  हि बातमी वाऱ्यासारखी वडज गावात पसरली आणि गावकऱ्यांनी मिळून बोरीच्या झाडाजवळ खंडोबाचे नवीन मंदिर बांधले. अशी हि वडज च्या खंडोबाची आख्यायिका आहे. 

मंदिराचे काम चांगले चालण्यासाठी देवस्थान ट्रस्ट ची १९६६ साली स्थापना करण्यात आली. १९७६ सालापासून येथे देवस्थान ट्रस्ट तर्फे सामुदायिक विवाह सोहळा चालू करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील सर्वात पहिले आणि सगळ्यात जास्त सामुदायिक विवाह सोहळा आयोजन करण्याचा मान वडज च्या श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्ट ला जातो. आज २१ व्या शतकात वडज गावकऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. आणि आज या खंडोबाचे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. 

देवस्थान सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असते. देवस्थान तर्फे येथे श्री कुलस्वामी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेची स्थापना आणि तसेच श्री कुलस्वामी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) ची स्थापना  करण्यात आली आहे . आजूबाजूच्या गावातील बरीच मुले मुली येथे शिक्षण घेत आहेत. 

देवस्थान तर्फे दरवर्षी चंपाषष्टी उत्सव तसेच माघ पौर्णिमा यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. देवाच्या पादुकांची पालखी मिरवणूक गावातून   काढण्यात येते. या  काळात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वडज ग्रामस्थ असलेलं परंतू व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे तसेच परदेशात असलेले वडज ला येऊन या सोहळ्यात सहभागी होतात.भाविक हजारो च्या संख्येने येथे दर्शना साठी येत असतात. देवस्थान तर्फे मंदिराच्या आजूबाजूचा परिसराचे सुशोभित करण्यात आला आला आहे. त्यामुळे नक्कीच वडज च्या निसर्ग सौंदर्यात भर पडली आहे. 

आपण कधी किल्ले शिवनेरी, जुन्नर, अष्टविनायक ओझर ,लेण्याद्री गणपतीला भेट देण्यास आलात तर नक्की या श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान ला भेट देऊन खंडोबाचे दर्शन नक्की घ्या.  


अधिक छायाचित्रे 







श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान, तिर्थक्षेत्र वडज ला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर , पुणे - जुन्नर , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव - जुन्नर) एसटी बस ची सोय आहे. जुन्नर पासून जुन्नर - पारुंडे , जुन्नर - चिंचोली, जुन्नर - वैष्णवधाम एसटी  ने वडज ला उतरावे. 

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे ,नाशिक 

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ 


माझा हा लेख आपणांस कसा वाटला, आवडल्यास मला खालील कमेंट मध्ये नक्की कळवा. 

धन्यवाद.

लेखक: हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad