पाककृती : जुन्नर स्पेशल : मासवडी आणि रस्सा | Junnar Special Masvadi Racipe in Marathi

आपण जुन्नर ला आलात किंवा आपल्या जुन्नरकर (जुंदरी) असलेल्या प्रियजनांच्या घरी गेलात आणि जुन्नरची स्पेशल मासवडी खाल्ली नाही असा कधीच होणार नाही. हिच जुन्नरची ओळख असलेली जुन्नर स्पेशल मासवडी घरी कशी बनवायची ते आज आपण शिकूया.


साहित्य:

सारणासाठी लागणारे साहित्य :
  • १ वाटी  तीळ
  • १ वाटी  खोबरं
  • १ वाटी लसूण (४ मोठे लसूण )
  • १ वाटी कांदा बारीक कापून
  • १/२ चमचा  गरम मसाला
  • १/४ चमचा हळद
  • हिंग आवडीनुसार
  • कोथींबीर
  • चवीपुरते मीठ

आवरणासाठी लागणारे साहित्य :
  • २ वाटी बेसन
  • १ चमचा लाल तिखट
  • १/४ चमचा हळद
  • चवीपुरते मीठ

रस्सा बनविण्यासाठी लागणारे साहित्य :
  • १ वाटी खोबरं
  • १ वाटी  कांदा
  • १०-१२ लसूण पाकळ्या
  • आले
  • कोथींबीर
  • २ चमचे गरम मसाला
  • १/२ चमचा लाल तिखट
  • १/४ चमचा हळद
  • मीठ चवीनुसार

कृती :

१) सारण बनविण्यासाठी तीळ ,खोबरं कोरडीच,वेगवेगळी  भाजुन घ्यावं.  गार पडल्यावर मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्यावं.

२) कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा व लसूण लालसर परतावे. कांदा व लसूण गार पडल्यावर मिक्सरमध्ये वाटावा.  वाटलेले कांदा लसूण आणि तीळ खोबरं एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालावे.

३)सारण तयार झाल्यावर आवरण बनवायला घ्यावे. कढईमधे तेल गरम करून त्यात लाल तिखट, हळद, मीठ घालावे. गरम झाल्यावर त्यात एक ग्लास पाणी  घालावे. पाण्याला उकळी आल्यावर त्यात बेसन पीठ घालून घोटून घ्यावं. गुठळ्या होवू देवू नयेत. गॅस मध्यम आचेवर ठेवून २-३ वाफा घ्याव्यात. पीठ चांगले शिजवून घ्यावे.

४)पीठ चांगले शिजल्यावर गरम आहे तेच वड्या बनवायला घ्याव्या. एका ताटावर रुमाल पसरवून घ्यावा. त्यावर पाण्याचा हात फिरवावा. त्यावर शिजवलेलं  गरम बेसन गोल आकारात पसरवून घ्यावं नंतर त्यावर सारणाचा पातळ थर द्यावा ,रुमालाच एक टोक वर पकडून बाहेरील बाजूने गोल गोल फिरवत वडी  बनवावी. थोडासा त्रिकोणी आकार देऊन एका ताटात काढून घ्याव्या. त्याला वरून खोबरं आणि कोथींबीर ने सजवावे . थंड झाल्यावर वड्या करून घ्याव्या.

५) रस्सा बनविण्यासाठी खोबरं कांदा लसूण पाकळ्या तव्यावर गरम तेलात परतून घ्यावं. गार पडल्यावर परतून घेतलेला खोबरं कांदा लसूण पाकळ्या आणि आले कोथींबीर सगळं मिक्सरवर बारीक वाटून घ्यावं. कढईमधे तेल गरम करून घ्यावं त्यात गरम मसाला, लाल तिखट, हळद घालावं बारीक केलेला मसाला घालून त्याला तेल सुटत पर्यंत गरम करून घ्यावं. मसाल्याला तेल सुटायला लागल्यावर त्यात आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून रस्सा बनवावा. चवीपुरते मीठ घालावे. १५-२० मिनिटे गॅसवर तर्री येत पर्यंत कड घ्यावा.

६) सर्व्ह करताना मासवडी रस्स्यासोबत वाढावी आणि त्यात चवीप्रमाणे लिंबू पिळून बाजरीच्या भाकरी सोबत खायला खूप छान वाटते. बाजरीची भाकरी नसेल तर तुम्ही चपाती सोबतही खाऊ शकता मात्र सोबत कांदा घ्यायला विसरू नका.

अशी हि जुन्नरची स्पेशल मासवडी आणि रस्सा घरी नक्की बनवून बघा आणि हा पदार्थ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

धन्यवाद.

माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad