भारतातील सर्वात प्रगत असलेल्या महाराष्ट्र राज्यातील विदयेचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्यातील उत्तरेस अखंड स्वराज्याचे छत्रपती श्री शिवाजी राजे शहाजीराजे भोसले महाराज यांची जन्मभूमी म्हणजेच शिवजन्मभूमी असा नावलौकिक असणारा तालुका म्हणजेच "जुन्नर" तालुका होय. जुन्नर शहराला इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. जुन्नर हे इसवी सन पुर्व सातवाहन कालखंडा पासूनच व्यापाराचे केंद्रस्थान होते. याच जुन्नर तालुक्यात इतिहासकालीन अशी मंदिरे सुद्धा आहेत त्यातील एक म्हणजे कुकडेश्वर मंदिर. चला तर मग आज आपण कुकडेश्वर मंदिराची माहिती घेऊ या.
कुकडेश्वर शिवालय हे महाराष्ट्रातील पुरातन काळी बांधलेल्या दगडी मंदिरांपैकी एक आहे. अखंड दगडात केलेले कोरीव काम आणि स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार असलेले हे मंदिर तुलनेने अप्रसिद्ध आहे. सदर मंदिर पांडवकालीन असल्याचे समजले जाते. प्रत्यक्षात इ. स. ७५० ते ८५० च्या आसपास शिलाहारांनी हे मंदिर बांधले असा उल्लेख आढळतो. या मंदिरापासून कुकडी नदीचा उगम होतो. पुढे याच नदीवर माणिकडोह धरण आहे. या धरणामुळे जुन्नर परिसर संपन्न बनला आहे.
कुकडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरपासून १५ किमी अंतरावर कुकडी नदीच्या तीरावर असलेल्या पुर गावात आहे. हे 12 व्या शतकातील शिवमंदिर आहे जे हेमाडपंथी स्थापत्यशास्त्रानुसार बांधले गेले आहे. मंदिराची जागा अप्रतिम सुंदर दिसते आणि तिच्या उत्तरेकडील कुकडी नदी तिच्या सौंदर्यात भर घालते.हे भगवान शिवाचे एक लोकप्रिय मंदिर आहे जे मंदिराच्या आतील आणि बाहेरील भिंतींवर त्याच्या भव्य कोरीव काम आणि शिल्पांसाठी प्रसिद्ध आहे.
संपूर्णपणे घन बेसाल्ट खडकापासून बांधलेले, कुकडेश्वर मंदिर हे प्राचीन वास्तुविशारदांच्या निर्दोष कारागिरीचा पुरावा आहे. मंदिराच्या भिंतींवर सुशोभित केलेले सूक्ष्म कोरीवकाम विविध पौराणिक दृश्ये आणि देवतांचे चित्रण करतात, ज्यांनी या दगडी संरचनेत प्राण फुंकलेल्या कारागिरांची अगाध भक्ती आणि श्रद्धा प्रतिबिंबित केली आहे. या मंदिराचा मुकुटमणी दागिना म्हणजे शिखर किंवा शिखर आहे, ज्याची सुंदर रचना आणि पूर्णता कोरलेली आहे, जी गर्भगृहावर आहे. या गर्भगृहात शिवलिंग आहे , हे भगवान शिवाचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व आहे, ज्याभोवती संपूर्ण रचना फिरते.
त्रिकुटाचाल मांडणीच्या अनुषंगाने असलेल्या या मंदिरात राष्ट्रकूट स्थापत्यकलेचे वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्य असलेल्या त्रिकोणी संरचनामध्ये तीन तीर्थस्थाने आहेत. ही अनोखी रचना भक्तांना मंदिराच्या आवारातून बाहेर न पडता अनेक देवतांना श्रद्धांजली अर्पण करण्यास अनुमती देते, ज्यामुळे आध्यात्मिक अनुभव वाढतो.
मंदिराची उंची साधारण १५ फूट आहे. प्रत्येक भिंतीवर आतून, बाहेरून पूर्णतः कोरीवकाम केलेले आढळते. मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असल्याने मंदिरात पुरेसा प्रकाश नाही. पुढील बाजूस उजवीकडे गणपती कोरलेला आहे. दारासमोरच एका अखंड दगडात नंदी कोरून काढला आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. दारावरील कोरीव गणेशपट्टी, उंबरठ्याजवळील दोन कीर्तिमुखे, दारासमोरचा नंदी आणि गणेश, वेलबुट्टी आणि अलंकारणे, शिवपिंडीची पूजा करणारी पार्वती अशी अनेक शिल्पे लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या आतील भागातही लक्षवेधी नक्षीकाम केलेले आढळते. मंदिराच्या पश्चिमेस एका गोमुखातून पाणी पडत आहे. त्या भागातही शिल्पखंड आणि नागशिळा मांडून ठेवल्या आहेत.
हे शिव मंदिर पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे सुस्थितीत आहेत. मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीव काम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा निर्णय झाला आहे. त्यानुसार मोठे दगड येथे आणून त्यावर कोरीव काम करून कळस उभारण्यात येणार आहे. या खर्चिक कामासाठी सरकारी निधी मंजूर झाला आहे.
मंदिरासमोरच दगडात खोदून तयार केलेला नंदी आहे. याच्या डाव्या बाजूस अजून एक छोटेसे मंदिर आहे. त्याच्या दर्शनी भागावर वृद्ध स्त्रियांची शिल्पे आहेत.मंदिराला आधार देणारे खांब पूर्णतः नक्षीकाम केलेले होते. येथे सर्वात वरती गणपती कोरलेला दिसतो आहे. खांबाच्या इतर दोन्ही बाजूस सारखेच शिल्प आहे. त्याखाली ढोल वाजवतानाच्या व्यक्तीप्रतिमांचे शिल्प आहे. त्याखाली तोरणासदृश्य नक्षीकाम आहे.
त्याच्या पुढच्याच/समोरच्या खांबावर कोरलेले एक नृत्यशिल्प आहे. गावातील वृद्धांकडून मंदिराचा इतिहास तपशिलात ऐकावयास मिळू शकतो.
कुकडेश्वर मंदिराला कसे पोहोचाल ?
जुन्नर पासून १७ किमी अंतरावर वा चावंड किल्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर हे मंदिर आहे. चावंडहून घाटघरला जाणाऱ्या मार्गावर चावंड किल्ल्याच्या पुढे ६ किलोमीटरवर एक फाटा फुटतो. तेथून पुढे ३ किलोमीटरवर हे मंदिर आहे. चावंड किल्ल्यापासून चालत गेल्यास अंदाजे २ तास लागतात. गावाचे नाव 'पूर' असले तरी कुकडेश्वर हेच नाव प्रचलित आहे. जुन्नर स्थानकावरून बस व्यवस्था आहे.
बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर - कुकडेश्वर / घाटघर / अंजनावळे , पुणे - जुन्नर - - कुकडेश्वर / घाटघर / अंजनावळे, पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव - जुन्नर) एसटी बस ची सोय आहे.
रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे ,नाशिक
विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ
धन्यवाद.
माहिती संकलन : श्री. हर्षल भगत