'सर्वसाक्षी जगत्पती।त्याला नकोच मध्यस्ती॥'
सत्यशोधक महात्मा जोतिबा फुले यांचे पूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले. यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचा विवाह बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. त्यांचे मूळ गाव कटगुण हे होते. महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. महात्मा फुलेंवर थॉमस पेन यांच्या ‘The Right Of Man’ या पुस्तकाचा प्रभाव होता.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.
विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
२८ नोव्हेंबर १८९० मध्ये थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचे पुणे येथे देहावसान झाले. पुढे ७ वर्षे त्यांचा वारसा सावित्रीबाईंनी सांभाळला. तोच सत्याचा वारसा पुढे राजर्षी शाहूमहाराज व आंबेडकर यांनी नेला. म्हणूनच तर आजही महाराष्ट्राचा उल्लेख हा फुले, आगरकर, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र असा होतो. अनेक समाजसुधारक विषयक कामे त्यांनी केली, कोणत्याही जातीला समोर ठेवून नाही तर विशिष्ट वंचित घटकाला विशेषतः महिला वर्गाला, शेतकऱ्यांना व गरीबांना ज्यामुळे अनेक गोष्टी जशा न्यायाची, हक्काची, सत्याची जाणीव करून देणाऱ्या. जसे शहाजी राजेंच्या अनुपस्थितीत १७व्या शतकातील जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती घडवला तसे तब्बल २०० वर्षांनी जोतीरावांच्या मदतीने सावित्रीबाईंनी शस्त्र हातात घेतले ते स्त्री शिक्षणाचे. कारण सगळ्या समस्यांचे निराकरण करणे केवळ शिक्षणानेच शक्य होते व ते ठराविक जणांना नाही तर त्यांच्यासोबत स्त्री व इतर वंचितांनाही मिळावे तेव्हाच हक्क, कर्तव्य व न्याय कळेल हे जोतीराव फुले जाणत होते.
१८९४ मध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला व सावित्रीबाईंच्या निधनानंतर(१८९७) शाहूराजेंनी स्वकार्यासमवेत फुले कार्य देखील पुढें नेले. शाहू महाराज हे देखील पुरोगामी विचारांचे होते. राजे असल्याने अनेक अधिकार त्यांच्या हातात होते त्यामुळे महाराजांनी अनेक वंचित बहुजनांना व शेतकरी बांधवांना, महिलांना वेगवेगळे कायदे करून हक्कच मिळवून दिले. त्यांना पुढे डॉ. आंबेडकरांची साथ भेटली व बाबासाहेबांनी संविधानाच्या रूपाने कायदेशीररित्या न्यायाची मुहुर्तमेढ स्वतंत्र भारतातील सगळ्या जनतेसाठी केली.
म. फुले यांना १९व्या शतकात वेगवेगळ्या घटकासाठी अनेक समाजसुधारक कामे करत असतांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आपल्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा विसर पडत चालला आहे याची. त्यांनी राजांची रायगडावरील समाधी शोधून शिवजयंती साजरी करण्यास सुरूवात केली. समाजाला माझ्या पराक्रमी राजाचा खरा इतिहास कळावा यासाठी १८७० च्या आसपास इतिहास संशोधन करून त्यांनी महाराजांचा पोवाडा लिहिला व पुढे शिवरायांच्या इतिहासावर पहिले पुस्तक ही लिहीले. म. फुले नसते तर काही पाखंडी लोकांनी आपल्यासमोर शिवाजी महाराज हे एक बाबा किंवा दैवी पुरूष होते असा इतिहास लिहून ठेवला असता.
शिवाजी महाराज, फुले, शाहू, आगरकर, आंबेडकर याची कार्ये ही एका जातीसाठी मर्यादित कधीच नव्हती व नाहीत. स्वराज्य-शिक्षण-सत्य-हक्क-न्याय यांची एकजूट म्हणजे ही माणसं होती आणि ते केवळ समानता नाही तर समता या तत्वाच्या आधारावर सर्वांसाठी मिळावे यासाठीच यांचे प्रयत्न होते पण दुर्दैवाने आपण उच्चशिक्षित साक्षर असूनही केवळ राजकीय पुढाऱ्यांमुळे आपण सुद्धा कळत नकळत वैयक्तिक स्वार्थासाठी या महापुरूषाना देखील जातीत अडकवून ठेवतो आहे. यांचे सर्वांचे कार्य निःस्वार्थ व अफाट आहे ज्याचा यांनी कोणीही कधीच गर्व ठेवला नाही, उलट आपला अधिकार नसूनही आपणच त्याचा माज करत आहे.
यांचे कार्य जर एका विशिष्ट जातीसाठी असते तर आजही तो तो समाज त्याच गोष्टींचा लाभ घेत असता जे कार्य या महापुरुषांनी केलय.
असो, सांगायचं तात्पर्य एवढंच की कोणत्याच महापुरुषांना जाती धर्मात अडकवून ठेवू नका, यामुळेच अखंड हिंदवी स्वराज्य निर्माण करणारा माझा राजा महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे हे कटू सत्य आहे.
असल्या अनेक कारणांमुळेच तर भारत १५० वर्षे पारतंत्र्यात होता व त्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिलंय. फुकट मध्ये मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आदर करा.
शेवटी एकच विनंती या महापुरुषांप्रमाणे समाजासाठी काही करता नाही आले तरी चालेल पण राजकारणाला बळी पडून त्यांना धर्मात वा जातीत वाटण्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मदत करू नका.
आणि या महापुरुषांच्या विचारांचा प्रसार व आचरण हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
धन्यवाद 🙏
एक शिवप्रेमी