ग्रामदैवत - मुक्ताई मंदिर नारायणगाव, ता.जुन्नर जि.पुणे | Muktai Temple Narayangaon Junnar Tourism in Marathi

ग्रामदैवत हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि भक्ती भावाचा विषय. ग्रामदैवत हि त्या गावाची खास ओळख असते. त्यामुळेच प्रत्येक वर्षी जवळपास सगळ्याच गावात या ग्रामदेवतेची यात्रा भरते. तेव्हा फक्त गावातीलच नाही आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठ्या भक्तिभावाने यात्रेत सहभागी होतात.अश्याच महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगाव चे ग्रामदैवत असलेल्या मुक्ताई मंदिराची माहिती घेऊया.


नारायणगाव हे सर्वार्थाने ऐतिहासिक आणि पारंपारिक असं ठिकाण आहे.नारायणगाव च्या एकदम मध्य भागी देवीचं मंदिर असून,मंदिराची कोरीव आणि सुंदर नक्षीकाम केलेली कमान तुमचं स्वागत करते.दूरवरून दिसणारा पितळी कळस मंदिराची शोभा वाढवतो.  मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोरच एक ऐतिहासिक आणि विशाल अशी दीपमाळ आपलं लक्ष्य वेधून घेते. मंदिराच्या आत गेल्यावर एक भव्य पितळी कासव असून देवळाच्या भिंतींवर सुंदर असं कोरीव काम केलेल आहे. प्रत्येक भिंतीवर देवी -देवतांच्या मूर्ती असून ,त्या खास कर्नाटक राज्यातून मागवल्या आहेत. मुख्य गाभाऱ्याच्या समोरच एक मोठा सभा मंडप असून , मंडपाच्या सगळ्या खांबांवर बारीक नक्षी काम केलं आहे. सभामंडपात एका वेळी जवळपास १४०० ते १५०० भाविक बसू शकतात.

दरवर्षी श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा वरूथिनी एकादशीला (चैत्र कृष्ण एकादशी) सुरु होऊन वैशाख शुद्ध त्रितिया ला समाप्त होते . या कालावधीत, पुर्ण तालुका नव्हे तर जिल्ह्यात सर्वात मोठी आसणा-या या यात्रेत संपुर्ण महाराष्टातुन लोक येत आसतात. जवळपास संपूर्ण गावात पाहुण्यांचे आगमन झालेले असते. आकाशपाळणे ,विद्युत रोषणाई ,खरेदीची दुकाने, या सर्वानी गाव गजबजून जातो. आठ दिवस मोफत चालणारे तमाशे,शोभेचे दारूकाम,आई मुक्ताई ची घागर हे यात्रेचं वैशिष्ट्य. अनेक भक्त मंडळी आपापल्या नवसाच्या डहाळ्या घेऊन देवीच्या दर्शनाला येतात. मांडव डहाळे बैल गाडी , ट्रॅक्टर वर सजवून वाजत -गाजत मंदिरापर्यंत आणले जातात.

नारायणगाव हे तमाशा ची पंढरी म्हणून ओळखलं जातं ,म्हणून या यात्रेत  तमाशा सादर करणं हे मानाचं आणि प्रतिष्टेचं समजला जातं. संपूर्ण यात्रा काळात रोज रात्री तमाशे मोफत दाखवले जातात.

 श्री मुक्ताई देवी व काळोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने येथील ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी मंदिरात नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले जाते.

नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नवरात्र काळात रोज पहाटे ५ ते रात्री ११ दरम्यान देवीची आराधना ,आरती ,महाआरती ,होम-हवन,देवीस अभिषेक ,हरिपाठ,कीर्तन  केलं जातं. नवरात्र महोत्सवात देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाई ने सजावट केली जाते .

चला तर मग , अशा या  पारंपारिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिराला नक्कीच भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेऊया.     

आई मुक्ताई चे आपल्यावर कृपाछत्र राहो ,हीच सदिच्या.

अधिक छायाचित्र


मुक्ताई मंदिर नारायणगाव ला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर  - नारायणगाव , पुणे - नारायणगाव , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव ) एसटी बस ची सोय आहे.

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे ,नाशिक

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ



धन्यवाद.

लेखक : श्री.प्रविण गोविंद दांगट

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad