ओवी : शिवजन्मभूमी जुन्नरचे महात्म्य - आनंदी रामकृष्ण जोशी | Junnar in Marathi

"आनंदी रामकृष्ण जोशी यांनी शिवजन्मभूमी जुन्नरचे महात्म्य सांगणारी कविता १९६८ साली बनविली होती. त्या आजी निरक्षर होत्या, मात्र त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. मौखिक पद्धतीने शब्द घेऊन त्या शिकायच्या. शिवजन्मभूमी जुन्नरचे महात्म्य सांगणाऱ्या खालील ओव्या त्या चालीत म्हणायच्या"


जुन्नर शहर आहे थोर । भोवताली डोंगर फार ।। १ ।।

शिवनेरी किल्ला मनोहर । चढतांना अवघड फार ।। २ ।।

दरवाजे सात कमानदार । बावन्न टाकी आहेत चौफेर ।। ३ ।।

ते धन्य धन्य शिवराजे । त्रैलोकी कीर्ती गाजे ।। ४ ।।

डोंगरात तुळजाबाई । तिचे स्वरूप वर्णू मी काही ।। ५ ।।

शिरी मुगुट, मळवट भाळी । चौहाती आयुधं सांभाळी ।।६।।

पायथ्याशी वर्सुबाई । पंचलिंग ठाई ठाई ।। ७।।

पुढे पाण्याची बारव पाही । मारुती सन्निध राही ।।८।।

लेण्याद्री गड चढणार । त्याला पायऱ्या तीनशे सत्तर ।। ९।।

मोरयाची कीर्ती बहु थोर । रात्रीतुनी कोरले डोंगर ।।१०।।

कोरीव गदा तिथे आहे । दगडाची भांडी पाहे ।।११।।

यात्रेला गर्दी होते भारी । पूजा घेई पाठीवरी ।।१२।।

उत्तरेश्वर, पाताळेश्वर । अष्टविनायकात ओझर ।।१३।।

कुकडीचा महिमा खरोखर । होडी चालते झरझर ।।१४।।

पारुंड्याचा ब्रम्हनाथ । त्र्यंबकेश्वर आहे साक्षात ।।१५।।

वडजचा खंडेराव । मंदिर कोरीव पहावं ।।१६।।

चैत्रमासी पौर्णिमेला । धामण खिलच्या खंडोबाला ।।१७।।

भक्त जाती दर्शनाला । उधळती भांडार हो त्याला ।।१८।।

तिथून कोसभर हो वरती । अंबा-अंबिकेची वस्ती ।।१९।।


साभार : आनंदी रामकृष्ण जोशी 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad