माळशेज घाट : लोकप्रिय पर्यटन स्थळ | Malshej Ghat in Marathi


या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती...

हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रितीचे...

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रितीचे.....

अजय अतुल यांचे हे लोकप्रिय गीत कानावर पडताच अंगावर शहारे येतात आणि चातका सारखे आपणासही पावसाळ्याचे वेध लागतात. पहिला पाऊस, पहिला मातीचा सुगंध, खळखळणारे धबधबा, नदी ओढातून वाहणारे पाणी, पक्षांचा किलबिलाट, हिरवी शाल पांघरलेले डोंगर, डोंगराआडून लपून बसणारे ढग, थंडगार वाऱ्याची झुळुया सगळ्यांचा मिलाफ म्हणजे मान्सूनराजाचे झालेले आगमन होय. 

मान्सूनचे आगमन होताच डोंगर दर्यातून धबधबे खळखळू लागतात. नदी ओढे भरून वाहू लागतात. निसर्गाचे हे सुंदर रूप बघून मन प्रसन्न होते आणि आपले पाऊले आपसूकच पावसाळी पर्यटन स्थळांकडे वळू लागतात. यातीलच महाराष्ट्रातील एक सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून माळशेज घाट प्रसिद्ध आहे. 

पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वत रांगांमध्ये निर्सार्गाची उधळण करत माळशेज घाट ठाणे जिल्यातील मुरबाड आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर यांच्या सीमेवर बांधण्यात आला. या पर्वत रांगांमध्ये माळशेज घाट बरोबरच दाऱ्याघाट, नाणेघाट, जीवधन किल्ला, सिंदोळा किल्ला, शिवनेरी किल्ला, हरिश्चंद्र गड, कोकणकडा, अष्टविनायकांपैकी ओझर, लेण्याद्री गणपती इत्यादी... पर्यटन स्थळे आहेत. तर आज या लेखात आपण माळशेज घाट विषयी अधिक माहिती घेऊया. 

आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जिथे घाट रस्ता सुरू होतो तिथे दरीत घुसलेल्या एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिझॉर्ट आहे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे.

या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो.पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट.

इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’ इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल.

माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात.

पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागते.

 माळशेज घाटला कसे पोहोचाल? 

बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट , पुणे - जुन्नर - माळशेज घाट , पुणे - आळेफाटा मार्गे माळशेज घाट, नाशिक - आळेफाटा मार्गे माळशेज घाट  एसटी बस ची सोय आहे.

रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे ,नाशिक 

विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ 


धन्यवाद.

माहिती साभार : दिव्या चव्हाण 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad