एकविरा आई, लोणावळा | Ekvira Aai in Marathi




एकविरा आई तू डोंगरावरी
नजर हाय तुझी कोल्यांवरी


कोल्याचा धंदा हाय जीवा उधारी 
पाठीशी उभी हाय एकवीरा आई ग
धनी माझा गेलाय बारांडोलीला
अवचित सुटलाय वादली वारा


मागनं मांगतंय एकविरा आई ग
धनी माझा येऊंदेस दर्या किनारी ग
दसर्‍याचे आई तुझे सणाला
जोर्‍यांशी येऊ आई तुझे होमाला


नवसाचा मान देऊ कोंबर्‍या- बकर्‍यांचा ग
खना नारलाशी भरीन ओटी ग
चैताचे आई तुझे सणाला
पोरांशी येऊ आई तुझे भेटीला




       एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते.
    देवींच्या जागृत स्थानास शक्तिपीठे म्हटले जाते. महाराष्ट्रात साडेतीन शक्तिपीठे मानली जातात. त्यापैकी पार्वती, यमाई, रेणुकामातेचा अवतार म्हणजे एकवीरा देवी होय. वेहरगाव-कार्ला गडावरील आई एकवीरा देवी ही आदिशक्ती असून, एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाची ख्याती आहे.

    १८६६मध्ये या मंदिराचा जीर्णोद्वार करण्यात आल्याचे समजते.चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते.नवरात्रीच्या नऊ दिवसांत एकवीरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक रांगा लावून दर्शन घेतात. यात्राकाळात महाराष्ट्रातून, विशेषतः कोकण, मुंबई, ठाणे या भागांतून लाखो कोळी बांधवांसह अन्य भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. मागील दहा वर्षांपासून देवीच्या स्थानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी या स्थानाला केवळ पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात होते. लेणी व परिसर भारतीय पुरातत्त्व विभाग आणि वन विभागाच्या अखत्यारीत आहे. परंतु या दोन्ही विभागांकडून अशा स्थळांची योग्य ती देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने अशा प्राचीन व पुरातन धार्मिक पर्यटनस्थळांची अवस्था दयनीय होत चालली आहे.

    महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांमध्ये कार्ला येथील एकवीरा देवस्थानचा समावेश आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे लोणावळ्याजवळील वेहेरगाव येथील कार्ला लेणी! या लेण्यांत ऐश्वर्य असले, तरी डामडौल नाही. पुणे-मुंबई या दोन महानगरांच्या मध्यभागी विपुल निसर्गसंपदा, प्राचीन व ऐतिहासिक लेण्या व गड-किल्ले, भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मावळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणारी कार्ला लेणी व श्री एकवीरा मातेचे मंदिर आहे.ही बौद्धकालीन प्राचीन लेणी असून, १६० ख्रिस्तपूर्व सनापासून अस्तित्वात आहेत. देवीची मूर्ती स्वयंभू पाषाणाची आहे. १८६६ ला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आल्याचे समजते. या परिसरातील देवीला वेहेरगावची यमाई, अंबामाता किंवा परशुराममाता रेणुका असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील विशेषत:, मुंबई, ठाणे, रायगड, कोकण भागातील कोळी, आगरी, माळी, कुणबी, सोनार, पाठारे, चांद्रसेनीय कायस्थ, ब्राह्मण, प्रभू, चौकळशी, पाचकळशी अशा अनेक समाजांची श्री एकवीरा देवी कुलस्वामिनी असून, श्रद्धास्थानही आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून एकवीरा आईची ख्याती आहे. चैत्र आणि आश्विन या दोन महिन्यांत देवीची यात्रा भरते. या दोन्ही यात्रांना कोकणातील कोळी बांधवांसह राज्यातील लाखो भाविक देवीच्या दर्शनास व नवस फेडण्यासाठी येतात. नवरात्रोत्सव हा स्त्रीशक्तीच्या पूजनाचा आणि स्तवनाचा असतो. यात्राकाळात राज्याच्या विविध भागांतून कोळी बांधवांसह इतर भाविक देवीच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात.

    मंदिराच्‍या परिसरात नित्‍यनियमित पूजा अर्चा आणि आरती अभिषेक करण्‍यात येतो. तर पौर्णिमा आणि आमावस्‍येच्‍या आदल्‍या दिवशी (चतुर्दशी) देवीला पंचामृत स्‍नान करून अभिषेक केला जातो. नवरात्रोत्‍सवाच्‍या काळात येथे मोठा उत्‍सव आणि जत्रेचेही आयोजन केले जात असते.

    सुर्यकन्‍या तापी नदीची उपनदी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पांझरा नदीच्‍या तीरावर आदिमाया एकवीरा देवीचेअतिप्राचीन मंदीर आहे. धुळे शहरातील देवपूर या उपनगरात असलेल्‍या या मंदिरातील शेंदूर लेपीत आणि पद्मासनी बसलेली ही स्‍वयंभू देवी महाराष्‍ट्रासह मध्‍यप्रदेश, राजस्‍थान, कर्नाटक आणि गुजरातमधील अनेक भाविकांची कुलदेवता असल्‍याने येथे सतत वर्दळ असते.

    भक्‍तांच्‍या संकटांना दूर करून त्‍यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्‍वयंभू अशी ही देवी असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे. आपल्‍या पराक्रमाने तिन्‍ही लोकी नावलौकीक मिळविलेल्‍या परशूराम या वीरपुत्राची जननी म्‍हणून आदिशक्‍ती एकवीरा देवी ओळखली जाते. एकवीरा आणि रेणुका माता या आदिमाया पार्वतीचीच रूपे असून देवीने अनेक अवतार धारण करून असुरांचा नाश केल्‍याची धारणा आहे. जमदग्‍नी ऋषींची पत्‍नी असलेल्‍या रेणुका मातेचा परशुराम हा एकमेव वीर पुत्र असल्‍याने या देवीस 'एक वीरा' असे संबोधले गेले आणि तेच नाव पुढे एकवीरा म्‍हणून रूढ झाले. कर्नाटक राज्‍यातही देवीचे मंदिर असून तेथूनही अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

धन्यवाद. 

माहिती संकलन : दिव्या सुनील चव्हाण 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad