मराठी सण : रक्षाबंधन आणि त्याचे धार्मिक महत्त्व | Rakshabandhan in Marathi



 "नात्यांचे गोड बंधन
 रेश्माच्या धाग्यांनी
अधिक समृद्ध करणारा सण
रक्षाबंधन"

"बहिणिच्या मायेचा
 भावाच्या प्रेमाचा
 सण जिव्हाळ्याचा
  रक्षाबंधनाचा"

बहिण-भावाच्या अतूट नात्याचा हा दिवस. भावाला राखी बांधण्यासाठी माहेरवाशीण बहिण भावाकडे जाते आणि त्याला ओवाळते. तर, भाऊ बहिणीला छानशी भेटवस्तू देऊन कायम तिला सुरक्षित ठेवण्याचं वचन देतो. याच शुभ सणाचा शुभमुहूर्त नेमका कधी याविषयी बरेच समज-गैरसमज आहेत.

                "थोडी लढणारी थोडी भांडणारी 
           थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी 
                मस्ती करणारी एक बहिण असते 
       तिच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते.”

राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावाबहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधासुधा धागा नाही. यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या रक्षेचे दिलेले वचन हे खूपच महत्त्वाचे असते. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन येते. हिंदूंच्या पंचांगानुसार श्रावण महिन्यामधील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे. या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल असते की, या सणाला नेमकी कशी सुरुवात झाली.


रक्षाबंधन’ हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख – सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे.त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील गर्भितार्थ आहे.  

आपण अनेकदा पाहतो की, बऱ्याचदा बहीण मोठी असते, ती आपल्या भावाचे रक्षण करते, ती स्वतःचे रक्षण करण्यासाठीही समर्थ असते. पण स्त्री कितीही कमावती, मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास या राखीमधून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिचा तिच्या भावाच्या कतृत्त्वावर जास्त विश्वास असतो आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखीपौर्णिमा साजरी करण्यात येते. या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे. त्यामध्ये कोणतीही फसवणूक नाही. भावाबहिणीचे नाते हे भांडणाचे, खोडीचे तरीही तितक्याच प्रेमाचे असल्याने हा केवळ धागा नसून त्या धाग्याला नात्याचे महत्त्व आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. इतकंच नाही तर काही ठिकाणी नोकर आपल्या मालकांना आणि गरीब लोक आपले पोषण करणाऱ्या धनवंतांनाही राखी बांधून हा सण साजरा करतात. आपल्या रक्षणाची आणि कुटुंबीयांची जबाबदारी आपल्यावर आहे अशी कृतज्ञता यातून व्यक्त करण्यात येते. सहसा ही पद्धत उत्तर भारतामध्ये दिसून येते. आता तर नक्कीच काळ पूर्णतः बदलला आहे. भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे अजूनही तितकेच घट्ट असले तरीही आता गोष्टींमध्ये बराच फरक पडला आहे. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्वीकारतो. काळ कितीही बदलला असला तरीही आजच्या काळातही भावा-बहिणीच्या या प्रेमाच्या ‘रक्षाबंधन’ या सणाचे महत्त्व कायम आहे. आता तर सोशल मीडियाच्या युगात वेगवेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन शुभेच्छा संदेशही पाठवले जातात.

रक्षाबंधनचं धार्मिक महत्त्व

कोणत्याही धाडसी, शूरवीर अशा पुरूषाने आपल्या आसपासच्या सर्व महिलांचे, दुर्बल, वृद्ध, आबाल, अपंगांचे रक्षण करणे हा धर्म समजण्यात येतो. पुराणात सांगितल्याप्रमाणे श्रावण पौर्णिमेला भटजी अर्थात पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद हे पवित्र मानण्यात येतात. या रक्षाबंधन सणाला धार्मिक महत्त्वदेखील आहे. मध्ययुगीन भारतामध्ये बाहेरील आक्रमणांपासून महिलांचे रक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत असे. त्याकाळी अनेकवेळा मुसलमानांचे आक्रमण होत असे. त्यामुळे रक्षणकर्त्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या या पवित्र संस्कृतीला तेव्हापासून धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. तर याच दिवशी महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठीही हा सण खास असतो. वरूण राजाची आराधना करत त्याला या दिवशी पूजण्यात येते. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला श्रावण नक्षत्र असेल तर हा दिवस अत्यंत लाभदायक आणि चांगल्या कामासाठी अनुकूल मानण्यात येतो.या पौर्णिमेला श्रावणी असेही म्हटले जाते. पाऊस पडल्यानंतर समाधानी शेतकरी आणि लोक वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव त्याकाळी साजरे करत होते. तर शिक्षण घेण्यासाठी सुरूवात करण्यासाठी हा शुभमुहूर्त काढण्यात येत असे. अध्ययनासाठी आरंभ, शौर्याचे प्रतीक म्हणजे श्रावणी असा अर्थ होतो. हेदेखील या सणाचे धार्मिक महत्त्व आहे.  


धन्यवाद. 
माहिती संकलन : दिव्या सुनील चव्हाण 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad