!! श्री मयूरेश्वर गणपती प्रसन्न !!
स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम | ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम || बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ||लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम |
या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभु गणपतींचा उल्लेख केला आहे. या आठ गणपतींच्या तीर्थस्थानांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायक यात्रा.
शास्त्रोक्त पद्धतीने अष्टविनायक यात्रा अशी केली जाते-
- पहिला गणपती - मोरगांवचा श्री मयुरेश्वर
- दुसरा गणपती - सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर
- तिसरा गणपती - पालीचा श्री बल्लाळेश्वर
- चौथा गणपती - महाडचा श्री वरदविनायक
- पाचवा गणपती - थेऊरचा श्री चिंतामणी
- सहावा गणपती - लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक
- सातवा गणपती - ओझरचा श्री विघ्नेश्वर
- आठवा गणपती - रांजणगांवचा श्री महागणपती
अशा या अष्टविनायक यात्रेतील पहिल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर गणपती ची माहिती आपण बघूया.
पहिला गणपती - मोरगावचा श्री मयुरेश्वर :
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर.श्री गणेशाचे हे आद्यपीठ होय.सिंधू व कमलासुर दैत्याचा संहार या स्थानी गणेशाने मोरावर बसून केला ,म्हणून या गणपतीस श्री मयुरेश्वर आणि मोरेश्वर असेही म्हणतात. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
मंदिर आणि परिसर:
अष्टविनायक मंदिरांमध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत. जवळच कऱ्हा ही नदी आहे.भोवती तटबंदी असून मंदिराच्या चारही दिशेला चार मिनारासारखे खांब आहेत. मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत.मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे.मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होते.नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे. मंदिराच्या गाभा-यात डाव्या सोंडेची मयुरेश्वराची मूर्ती आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत.मूर्तीच्या बाजूला रिद्धी-सिद्धीच्या मूर्ती आहेत.
स्थान : तालुका बारामती, जिल्हा पुणे, पिन- ४१२ ३०४
जवळची ठिकाणे :
- पांडवांनी बांधलेले पांडेश्वर मंदिर.(अंदाजे १३ किमी)
- जेजुरी-खंडोबाचे देवस्थान-(अंदाजे १७ किमी)
- नारायणपूर येथील एकमुखी दत्ताचे मंदिर-नारायण महाराज आश्रम व दत्तमंदिर
- कानिफनाथाचे मंदिर-बोपगाव
अंतर :
- पुणे-सासवड-मोरगाव ६४ कि.मी.
- पुणे-चौफुला-मोरगाव ७५ कि.मी.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.
धन्यवाद.
माहिती संकलन : श्री.प्रविण गोविंद दांगट