पाऊस.....!!!!!!!!!!
मनात माझ्या पाझरतो.
वाऱ्यासंगे कृष्णमेघांनी
केला अनोखा प्रवास
फळ मिळे संयमाचे
तहानलेल्या चातकास
होऊनी सळसळ पानांची
बरसू लागल्या धारा
सुगंध आला मातीचा
आला थबकत वारा
चिंब भिजुनी नटली झाडे
आबालवृद्ध करिती मौज
पावसाच्या आगमनाने
फिटली धरणीची हौस
रात्रीसम गर्द गहिरा
कोणासाठी हिरवे रान
पाहुनी तव रूप साजिरे
हरवून जाई मनीचे भान
सावळी सोज्वळ धरा भासते
तरी कसा हा हिरवळतो
कौलारावर नाचून दमतो
जरा फटीतून ओघळतो
सरीमागूनी सरी बरसते
भयावह वादळी वारे
समोरचे ना दिसते काही
रूप असे हे विराट का रे?
कधीतरी हा कृष्ण सावळा
जरा काहीसा बावरतो
सरकत जातो आत खोलवर
मनात माझ्या पाझरतो.
धन्यवाद.
कवी : कु.मयूर महादेव पालकर, मुंबई