इडली हा पदार्थ प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे. इडली आता सर्रासपणे सगळीकडेच नाश्तासाठी बनवली जाते. इडली पचायला हलकी फुलकी असल्याने अगदी रुग्णापासून ते सर्वसामान्यांच्या आहारामध्ये समावेश करू शकतो. म्हणूनच आहारामध्ये इडलीचा समावेश करणे आरोग्यदायी पर्याय आहे.लहान मुलांनादेखील पचायला हलकी असल्याने डब्याला द्यायला उत्तम पर्याय आहे.
इडलीसाठी साहित्य :
सांबारसाठी साहित्य :
कृती :
फायदे :
इडलीसाठी साहित्य :
- २ वाटी तांदूळ
- १ वाटी उडीद डाळ
- ६-७ मेथी दाणे
- मीठ
- ओले खोबरे
- जिरे-मोहरी
- हिरव्या मिरच्या
- तेल
- मीठ
- कोथींबीर
- कढीपत्ता
सांबारसाठी साहित्य :
- १ कांदा बारीक कापून
- १ टोमॅटो कापून
- १ उकडलेला बटाटा
- आले लसूण पेस्ट
- शेवगा
- लाल भोपळा
- तूर डाळ
- मीठ
- तेल
- जिरे-मोहरी
- लाल तिखट
- हळद
- सांबर मसाला
- कढीपत्ता
- कोथींबीर
- खोबरे किसून
कृती :
- इडली बनविण्यासाठी तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून दिवसभर भिजवून घ्यावे. रात्री झोपताना मिक्सरवर बारीक वाटून चिमूटभर सोडा आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून उबदार जागी ठेवावे.
- गॅसवर इडलीच्या पॅनमध्ये पाणी गरम होऊ द्या इडलीच्या साच्यामध्ये थोडे तेल लावा आणि रात्रभर भिजवलेले पीठ योग्य प्रमाणात भरा. झाकण ठेवून १० -१५ मिनिट शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करून साचे बाहेर काढा सर्व इडल्या साच्यातून बाहेर काढून घ्या.
- चटणीसाठी ओला नारळ किसून घ्या. मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, किसलेले खोबरे, कोथींबीर बारीक करून घ्या. एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घ्या त्यात जिरे- मोहरी,कढीपत्ता घाला आणि वरून बारीक केलेले खोबरे टाका. आवश्यकतेनुसार मीठ टाका.
- सांबर बनविण्यासाठी तूर डाळ आणि एक बटाटा , शेवगा, भोपळा कुकर मध्ये उकडून घ्या. कडईमध्ये तेल गरम करून घ्या त्यामध्ये कढीपत्ता जिरे- मोहरी, आले लसूण पेस्ट ,लाल तिखट सांबर मसाला टाकून त्यात बारीक चीरलेला कांदा चांगला परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो आणि बटाटा कुस्करून घालावा. शेवगा आणि भोपळा फोडणीमध्ये घालावा.
- उकडून घेतलेली तुर डाळ घोटून त्यात घालावी आणि वरून कोथींबीर किसलेले खोबरे घालावे.
फायदे :
- इडलीमध्ये सोडियमचे प्रमाण कमी असते म्हणून रक्तदाबाच्या रुग्णांसाठी इडली हा आरोग्यदायी नाश्ता आहे.
- इडली हा कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे.
- इड्लीमध्ये तेल वापरत नसल्याने कॅलरीदेखील कमी असतात.
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट