शिवनेरी, रायगड, राजगड, सिंहगड हे सामान्यांना परिचित असे गडकोट! पण त्याच वेळी हडसर, चावंड, जीवधन अशी नावे घेतली तर हे गड आहेत, असे सांगूनही अनेकांचा विश्वास बसत नाही. असे असंख्य गडकोट आपल्या सह्य़ाद्रीत विखुरलेले आहेत. यातलाच हा हडसर जुन्नरपासून १२ किलोमीटरवर! हडसर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एक ऐतिहासिक किल्ला आहे. हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड आहे. जुन्नर हा खूप गडकिल्ल्यांनी नटलेला ऐतिहासिक तालुका आहे.
नाव : हड्सर
उंची : ४६८० फुट
प्रकार : गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी : सोपी
ठिकाण : जुन्नर, पुणे
जवळचे गाव : हडसर,जुन्नर
इतिहास :
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव पर्वतगड असून सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली आहे. सातवाहन काळात या गडावर भरपूर वावर होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला.
शहाजी राजांनी १९३७ मध्ये मोघालांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ला एक होता.
ज्या पाच किल्लयांच्या मदतीने शहाजीराजांनी स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला, त्यामध्ये या हडसरचा समावेश होता. शिवकाळाबद्दल हा गड फारसा बोलत नाही. पण जयराम पिंडे यांच्या ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यानम्’ या संस्कृत काव्यग्रंथातील पहिल्या अध्यायातील ३७व्या श्लोकात हडसरचा उल्लेख येतो. तो असा-
तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च।
महिषोप्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।।
चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड आणि हडसर हे किल्ले शिवाजीमहाराजांनी जिंकून घेतल्याचा हा उल्लेख आहे. गडाचे ‘पर्वतगड’ हे नामकरण याच काळात झालेले असावे. कृष्णाजी अनंत सभासद त्यांच्या बखरीमध्ये या गडाचा उल्लेख पर्वतगड असाच करतात.
यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले .मग इंग्रजांच्या एका तुकडीने या गडाला वेढा घातला आणि २५ एप्रिल १८१८ रोजी या गडाचा हा इतिहासकाळ संपुष्टात आला.हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.
गडाचा हा सारा इतिहास आठवतच आतमध्ये शिरताच जमिनीलगत खोदलेले टाके दिसतात. त्याच्या काठावर एक छोटेसे शिवलिंग कोरलेले आहे. पावसाळय़ात टाक्यामधून बाहेर पडणारे पाणी या शिवलिंगावर सतत अभिषेक घालत असते.
आत शिरताच सुरुवातीला सगळीकडे माजलेले गवत दिसते. या गवतामधूनच हिंडताना मग किल्लेदाराचा वाडा, शिबंदीची घरटी, पाण्याची तळी असे सगळे दिसू लागते.
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहेत.
गडावर एक महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोरच्या माणिकडोह धरणाचा परिसर बघता येतो.
मार्ग :
हडसरला जाण्यासाठी प्रथम तालुक्याचं जुन्नर शहर गाठावं, जुन्नरहून निमगिरी, राजूर, केवाडा या बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगराकडे जाताना एक विहीर लागते. तेथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जाऊन पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व तटबंदी नजरेस पडते. तसेच समोर चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरूजापाशी पोहचता येते. येथूनच आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो.
अधिक छायाचित्रे
किल्ले हडसर ला कसे पोहोचाल?
बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर , पुणे - जुन्नर , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव - जुन्नर) एसटी बस ची सोय आहे. जुन्नर पासून जुन्नर - निमगिरी , जुन्नर - राजूर एसटी ने हडसर ला उतरावे.
रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे ,नाशिक
विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट.
बस : मुंबई - कल्याण - माळशेज घाट मार्गे - जुन्नर , पुणे - जुन्नर , पुणे - नाशिक -पुणे (नारायणगाव - जुन्नर) एसटी बस ची सोय आहे. जुन्नर पासून जुन्नर - निमगिरी , जुन्नर - राजूर एसटी ने हडसर ला उतरावे.
रेल्वे : जवळचे रेल्वेस्थानक : कल्याण , पुणे ,नाशिक
विमानतळ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ , पुणे विमानतळ
धन्यवाद.
माहिती संकलन : सौ.किर्ती प्रविण दांगट.