संपादकीय : महापुरुषांचे होत असलेले दैवतीकरण यामुळे त्यांचा गौरवशाली इतिहास पुसला जाईल का? | Deification of great men in Marathi

नमस्कर मित्रांनो, आजच्या संपादकीय मध्ये आपण एक खूप संवेदनशील आणि महत्त्वपुर्ण विषयावर प्रकाश टाकणार आहोत हे आपल्याला शीर्षक वाचून लक्ष्यात आले असेलच. बघा पटतंय का तुम्हाला. 

महापुरुषांचे होत असलेले दैवतीकरण यामुळे त्यांचा गौरवशाली इतिहास पुसला जाईल का?


एक लहान मुलगा नि त्याच्या आई मधील हे एक संभाषण आहे....
लहान मुलगा आईला : आई श्री कृष्णाला १६ सहस्र बायका होत्या?
आई : हो.
मुलगा : कस काय?
आई : बाळा ते देव होते.
वरचं संभाषण बहुदा आपण अनुभवले तरी असेल किंवा ऐकले तरी असेल.

असो हे उदाहरण देण्याचा हेतू हा खूपच महत्वाचा.

गेले अनेक दिवसांपासून काही मतिभ्रष्ट लोकांकडून छत्रपती शिवराय हे दैवी अवतारच असल्याचा जाणूनबुजून प्रसार तथा प्रचार होताना दिसतोय. भावनेच्या भरात आपल्या समाजाकडूनही अनावधानाने हे मान्य केल जात आहे किंबहुना ते पसरवण्यात मदत केली जात आहे. ज्यामुळे कालांतराने राजे देवच होते व त्यामुळेच त्यांना हिंदवीस्वराज्य व त्याचा इतिहास निर्माण करता आला असाच इतिहास हळूहळू रूढ होऊ शकतो. मग ते बुद्ध हे श्रीविष्णू चा नववा अवतार होणे असेल किंवा तुकाराम महाराजांचे वैकुंठाला जाणे असेल हे देखील विचार करायला भाग पाडते.

मित्रांनो, लक्षात ठेवा जर आपण शिवरायांकडे केवळ देव या भावनेने वा नजरेनेच पाहिले तर आपण त्यांच्या कर्तृत्वाला तिलांजली दिल्यासारखे आहे. कारण पुराणानुसार दैवी शक्तीच अस काही मोठ करू शकते. आपण शिवरायांना आराध्य दैवत मानतोय (कदाचित त्यांनीच आराध्य दैवत अस जाणूनबुजूनच पेरल आसाव, पण आस्था व श्रद्धा म्हणून आपण मानतोच) परंतु याचा गैरफायदा घेऊनच काही लोकं त्यांचा असा प्रसार करू पाहताहेत. विशेष म्हणजे ज्या वयात आपण शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो (इयत्ता ४थी इतिहास) तो इतिहास देखील शैक्षणिक अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात आला. कदाचित राजांचा दैवी अवतार असाणारा नवीन इतिहासाचही समाविष्ट होऊ शकतो. कारण, याच वयात या गोष्टी मनावर बिंबवून एक प्रकारे त्यांचा कायमचा हेतू साध्य करण्याचाही डाव असावा.

 आज आपण आस्था व श्रद्धा यामुळे दैवत मानतोय हे ठीक पण दैवी अवतार आला म्हणजे चमत्कार आला आणि इतिहास गेला. खरतरं शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात हे खूप अभिमानास्पद आहे, पण यापाई उद्या मंदिरे येतील, पालखी येईल, आरती बनवली जाईल, मिरवणूका तर आहेतच. कदाचित गणपती बाप्पा प्रमाणे सर्वच. मग १० व्या दिवशी आपण गणपतीच्या प्रतिमांची परिस्थिती पाहतोच. आणि असे महाराजांचेही होऊ शकत नाही का?

खर तर, भोळ्या भाबड्या समाजाला शिक्षण नसतांना अशा गोष्टी रूढ होणे अपेक्षित असते तरीही आधुनिक काळात महात्मा फुलेंनी, आगरकरांनी, शाहूंनी, आंबेडकरांनी सर्वांना तसे शिक्षण देण्याचा प्रयत्न ही केला व हे पटवून ही देत गेले पण तरीही दूर्दैवाने ते कार्य आजवरही अपूर्णच राहीले व त्यांनाच भयंकर विरोध सहन करावा लागला. पूर्वी पासून अनेक महापुरूषांना देव बनवण्यात आले आहे, आजही शिवरायांसारख्या अनेक महापुरूषांनाच दैवी अवतार बनवण्याचा घाट सुरूच आहे व भविष्यातही राहू शकतो. आज शिवाजी महाराज, उद्या राजमाता जिजाऊ, नंतर संभाजी महाराज, मग म.फुले, शाहूराजे, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, स्वामी विवेकानंद हे असे सगळेच महापुरुष कालांतराने भविष्यात देव बनवले असतील व समाज त्यांचा इतिहास नाही तर पुराणे वाचत असेल.

पण आजच्या सुशिक्षित व वैज्ञानिक युगात अशा गोष्टी घडणे व महत्त्वाचे म्हणजे ते स्वीकारणे हे या पिढीला अशोभनीय आहे.

माझ येवढच म्हणणं आहे, की उद्या आपण एखाद्या लहान मुली-मुलांना शिवरायांचा वा अन्य कोणत्याही महापुरुषांचा इतिहास सांगत असतांना त्यांनी विचारले की शिवाजी महाराज हे एवढं कस निर्माण करू शकले, वा अमुक हे महापुरुष हे एवढं महान कार्य कसे करू शकले तर आपले उत्तर हे त्यांचे कर्तृत्व पटवून देण्यासारखेच व विवेकपूर्ण असावे पण ते देव होते म्हणूनच त्यांना हे करता आलं अस उत्तर जर द्याव लागलं, तर त्याला आजची परिस्थिती व आपण दोन्हीही जबाबदार असू. 

बघा पटतंय का तुम्हाला. तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्स मध्ये नक्की आणि  सहमत असाल तर नक्की शेअर करा. 

धन्यवाद 🙏

आपलाच एक शिवप्रेमी. 

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad