“वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा”
विद्येची देवता असलेला, अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मंडळींच्या आपला लाडक्या गणपती बाप्पाचं आज आपल्या घरी आगमन होत आहे. यंदाचा कोरोना लॉकडाऊन मधला गणेशोत्स्तव थोडा वेगळा असला तरी गणेशोत्सत्वाबद्दल असलेली माया, प्रेम, उत्साह थोडाही कमी झालेला नाहीये हे विशेष. अशाच आजच्या संपादकीय मध्ये गणपतीचं आगमन, त्याची पूजा, गणेशोत्सावाचा सोहळा याची माहिती आज घेऊया. महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात एवढंच काय तर अगदी विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.
गणेशोत्सव सोहळा
हिंदु धर्मीयांची आराध्यदेवता श्री गणेश. भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करतांना आपल्याला पहायला मिळतात.गणपती ही बुध्दीची देवता असुन प्रत्येक कार्यारंभी त्याचे पुजन प्रथम करण्याची प्रथा असल्याने प्रत्येक हिंदु हृदयात या गणेशाप्रती आदराची भावना विराजमान आहे.घरोघरी आणि मंडपोमंडपी येणारा हा बाप्पा येतांना सर्वत्र आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेउन येतो. त्याच्या आगमनापुर्वीपासुनच कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे त्याची पुजा अर्चना करतात.कुठे बाप्पा संपुर्ण दहा दिवस, कुठे पाच दिवस, कुठे दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील येतो.
गणेशोत्सवामध्ये वातावरणातला भरपूर उत्साह आणि आनंद भरलेला असतो. मुलांच्या स्पर्धा, नवीन सजावट, मखर, नवनव्या कल्पना, त्या पाहण्यासाठी होणारी गर्दी असं चित्र दिसू लागतं. या उत्सवी स्वरूपात आरोग्य संदेशही दडलेला असतो हे समजल्यावर आपण चकीत होतो आणि आपल्याला अभिमानही वाटू लागतो. गणेशोत्सवामागचा आरोग्यविचार समजून घेताना टिळकांनी १०० वर्षांपूर्वी समाजबांधणीसाठी गणेशोत्सव सुरू केला होता, हेही लक्षात ठेवावं लागेल.
श्री गणेशाची मुर्ती
श्री गणरायाची मुर्ती ही मातीचीच असावी. शक्यतो शाडु मातीची मुर्ती बसवावी किंवा काळया मातीची देखील मुर्ती चालेल परंतु आजकाल सुबक आणि रेखीव म्हणुन प्लॅस्टर ऑफ पॅरीस च्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते त्यामुळे पर्यावरणाचं समतोल बिघडत आहे. त्यामुळे इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणे हि काळाची गरज आहे.
प्रतिष्ठापनेची पुजा
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना पार्थिव मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं दुर्वा अर्पण करून अखेर नैवेद्य आणि आरती अशी प्रथा आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी भारतीयांना एकत्र आणण्याकरीता आणि विचारांची देवाणघेवाण करण्याकरीता या उत्सवाची सुरूवात केली होती.अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येतं.अवघ्या भारतभर विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणामुळे कितीतरी हातांना रोजगार उपलब्ध होतो. कोटयावधीची उलाढाल होतांना आपल्याला दिसते.संपुर्ण बाजारपेठ उपयोगी वस्तुंनी भरलेली दिसते. मुर्तीकारांची लगबग तर कित्येक महिने अगोदरपासुन सुरू झालेली पहायला मिळते.
गणेश विसर्जन
अनंत चतुर्दशी ला आपल्या लाडक्या गणरायाच्या विसर्जना वेळी प्रत्येक मन भावुक झाल्याचं दिसतं. दहा दिवस एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं होउन जातं. तो दिवस सगळयांकरताच मोठया जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देण्याचा आणि कठीण क्षण असतो. पावलं जड होतात. लहानं बच्चेकंपनी तर अक्षरशः रडतांना देखील दृष्टीस पडते.“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष आसमंतात घुमत असतो.
महाराष्ट्रातील गणेशोत्सव
गणेशोत्सव दर वर्षी भारतीय पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्या मध्ये भाद्रपदात महिन्याच्या शुक्ल पक्षापासून सुरु होतो. श्री गणेशाच्या डोक्यावर दुर्वा ठेवल्या जातात.देवाला जास्वंद ची फुले फार आवडतात अशी आख्यायिका आहे त्यामुळे देवाला जास्वंद चा हार घातला जातो. मोदक तयार करून नैवद्य म्हणून देवल दाखवले जातात. त्यानंतर गणेश आरती केली जाते व सर्वाना गणपतीचा प्रसाद वाटप केले जाते.
दहा दिवस उत्सव चालतो आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीच्या विसर्जनाने हा उत्सवाची सांगता होते. पेशव्यांच्या काळात हा उत्सव फक्त घरगुती स्वरूपात साजरा केला जायचा परंतु इ.स.१८९३ साली लोकमान्य टिळकांनी सर्व लोक एकत्र यावेत म्हणून हा उत्सव सार्वजनिक साजरा करण्याची प्रथा चालू केली.
मुंबई व पुण्यात हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.पुण्यात पाच मानाचे गणपती आहेत.तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशी बाग,कसबा पेठ आणि केसरी वाडा. या व्यतिरिक्त दगडूशेठ हलवाई, बाबू गेनू ,मंडई, आणि जिलब्या मारुती ही आणखी काही मोठी मंडळे आहेत. भव्य देखाव्यासाठी पुण्यातील हिरा बाग मंडळ प्रसिद्ध आहे.मुंबईमधील लालबागचा राजा मंडळ सर्वात प्रसिद्ध मंडळ असून सर्वात मानलेला गणपती आहे. आगोदर च्या काळात गणेश मूर्ती लहान व छोट्या स्वरूपात असत परंतु आजकालच्या काळात गणेश मूर्ती फार भव्य दिव्या स्वरूपात तयार केल्या जातात.त्यांच्या समोरचे देखावे सुद्धा तसेच भव्यदिव्य स्वरूपाचे राहतात.
कोरोनाच्या लॉकडाऊन मधला गणेशोत्सव
संपूर्ण जगात आणि भारतात कोरोनाने थैमान घातले असताना जगातील बहुतांश ठिकाणी अजूनही लॉकडाऊन चालू आहेत. भारत हि त्याला अपवाद नाहीये. अशाच या लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्रातील लोक आषाढी एकादशी पासून तर श्रावण महिन्यातील स्वातंत्रदिन, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा आणि आजपासून चालू होणारा गणेशोत्सव सोशल डिस्टन्स पाळून मोठ्या भक्तिभावाने सण साजरा करत आहेत. त्यांच्या उत्साहात थोडाही कमीपणा आलेला नाहीये.
यंदाचा गणेशोत्सव महाराष्ट्र राज्य सरकारने घालून दिलेल्या लॉकडाऊन च्या नियमानुसार साजरा होणार आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मंदिरामध्ये तर काही ठिकाणी छोट्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. हि मंडळे पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
काही गणेशोत्सव मंडळांनी मंडळ सजावट तसेच गणपतीची मूर्ती यावर होणारा खर्चाला फाटा देत, कोरोनाशी लढा देणाऱ्या आपल्या कोविड योध्यांसाठी, डॉक्टर, नर्स, पोलीस, सेक्युरिटी गार्ड या देवदूतांसाठी विविध मदत करत आहे हि गोष्ट नक्कीच कौतुकास पात्र आहे. यामुळे सामाजिक भावना जपण्यास मदत होत आहे.
यंदा आपल्याला गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आपल्या नातेवाईकांच्या, मित्र मंडळींच्या घरी जरी जात येणार नसले तरी आपण ऑनलाईन आपल्या लाडक्या गणपती बाप्पा चे दर्शन घेऊ शकतो. शेवटी आपण आपले सण साजरे करताना आपल्यासह आपल्या प्रियजनांची काळजी घेणे घेणं तेवढंच आवश्यक आहे.
अशा या आजपासून सुरवात होणाऱ्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाच्या आम्ही जुन्नरकर च्या सर्व प्रियवाचकांना खूप खूप शुभेच्छा. गणेशोत्सवाच्या या आनंदाबरोबरच कोरोनाचे संकट हि लवकर निघून जाऊ देत आणि सर्वाना उत्तम आरोग्य लाभू दे हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करतो.
आमच्या अष्टविनायक गणपती सिरीज ला भेट द्यायला विसरू नका आणि घरबसल्या अष्टविनायकाचे दर्शन घ्या.
- पहिला गणपती - अष्टविनायक : श्री मयूरेश्वर गणपती तिर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती जि. पुणे
- दुसरा गणपती - अष्टविनायक : श्री सिद्धिविनायक गणपती तिर्थक्षेत्र सिद्धटेक ता. कर्जत जि. अहमदनगर
- तिसरा गणपती - अष्टविनायक : श्री बल्लाळेश्वर गणपती तिर्थक्षेत्र पाली ता. सुधागड जि. रायगड
- चौथा गणपती - अष्टविनायक : श्री वरदविनायक गणपती तिर्थक्षेत्र महाड ता. खालापूर जि. रायगड
- पाचवा गणपती - अष्टविनायक : श्री चिंतामणी गणपती तिर्थक्षेत्र थेऊर ता. हवेली जि. पुणे
- सहावा गणपती - अष्टविनायक : श्री गिरिजात्मक गणपती तिर्थक्षेत्र लेण्याद्री ता. जुन्नर जि. पुणे
- सातवा गणपती - अष्टविनायक : श्री विघ्नहर गणपती तिर्थक्षेत्र ओझर ता. जुन्नर जि. पुणे
- आठवा गणपती - अष्टविनायक : श्री महागणपती गणपती तिर्थक्षेत्र रांजणगाव ता. शिरूर जि. पुणे
माझा हा लेख आपल्याला आवडल्यास मला खालील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि हा लेख आपल्या प्रियजनांबरोबर शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
लेखक: कु. हर्षल एकनाथ भगत, मुख्य संपादक